संग्रहित छायाचित्र 
ठाणे

मला जेलमध्ये टाकणाऱ्यांचे सरकार आणणार का? एकनाथ शिंदे यांची मतदारांना भावनिक साद

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर मला जेलमध्ये टाकतील. तुम्ही या एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकू देणार का? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना भावनिक साद घातली.

Swapnil S

ठाणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर मला जेलमध्ये टाकतील. तुम्ही या एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकू देणार का? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना भावनिक साद घातली. आजची मिरवणूक ही उमेदवारी भरण्यासाठी काढण्यात आली असली तरी, ही विजयाची मिरवणूक असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सकाळपासून माझ्यासाठी हजारो लोक मिरवणुकीत सामील झाले आहेत. तुम्ही सगळ्यांनी माझी निवडणूक हातात घेऊन मला राज्यात फिरण्यासाठी मोकळे केले आहे. तुम्हीच माझा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून समोरच्यांची अनामत रक्कम जप्त कराल. त्याकरिता तुम्ही गाफील राहू नका. एक एक मत महत्त्वाचे आहे. गावाला गेलेल्या सर्व आपल्या नातेवाईकांना, मतदाराला बोलावून घ्या. तुम्हाला योजना सुरू ठेवायच्या असतील, तर महायुतीला मतदान करणे किती आवश्यक आहे, त्यांना समजावून सांगा, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

ज्यांनी योजना बंद पडल्या ते आपल्यासमोर मशाल घेऊन आले आहेत. पण ती मशाल क्रांतीची नसून महाराष्ट्राला आग लावणारी, जातीजातीत भांडणे लावणारी आहे. त्यांना कायमचे घरी बसवा, असे आव्हानच मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांना दिले आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे हे रथावर होते.

सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला आणि आरती ओवाळून आशीर्वाद घेतले. दिघे यांच्या शक्तिस्थळावर नतमस्तक होऊन शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली. 'लोकनाथ लोकनाथ.. लोकांचा लोकनाथ एकनाथ, येऊ दे तुफान ही लाभू दे तुझी साथ एकनाथ'.. 'अनाथांचा नाथ, एकनाथ' या गाण्यावर सर्व कार्यकर्ते भारावून गेले होते.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह युतीचे नेते रॅलीमध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रवादी, भाजप, आरपीआय यांच्यासह महायुतीचे सर्व स्थानिक नेते आणि कार्यकर्ते हे आपापल्या झेंड्यासह या रॅलीत सहभागी झाले होते. वागळे इस्टेट येथील आयटीमधील निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेली रॅलीतील गर्दीमुळे मुलुंड चेकनाक्यापर्यंत वाहनांची रांग लागली होती.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध