स्वररूपिणी आशा

गेली सात दशके आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चिरतरुण... चतुरस्र गायिका आशा भोसले यांचा हा अल्पपरिचय.
स्वररूपिणी आशा
स्वररूपिणी आशा
Published on

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे नाव संगीतविश्वात मोठ्या आदराने घेतले जाते. फक्त मराठी किंवा हिंदीच नव्हे, तर बंगालीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. तब्बल सात दशकांहून अधिक काळ आपल्या गोड गळ्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताईंनी १२ हजारांपेक्षा जास्त गाणी गायली. शास्त्रीय संगीत, गजल, भक्तिगीते, भावगीते, लोकगीते, मादकगीते, पॉप, कॅबरे, लावणी, ठुमरी, कव्वाली या गाण्यांच्या प्रत्येक क्षेत्रात आशा भोसलेंनी अमिट मुद्रा उमटवली.

स्वररूपिणी आशा
आशाताईंचा कायमच तरुण असलेला गीत फंडा - दिलीप ठाकूर

संघर्षपूर्ण, खडतर प्रवास

‘मेलोडी क्वीन’ आशाताई यांचा सहा दशकांचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण, खडतर असाच राहिला. प्रारंभी अतिशय वाईट दिवस त्यांनी आयुष्यात अनुभवले. वयाने जवळपास दुप्पट असलेल्या तसेच लतादीदींसह घरातील सर्वांचाच कडाडून विरोध असताना, आशाताईंनी घरातून पळून जाऊन गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. लतादीदींचे स्वीय सचिव असलेल्या गणपतराव यांच्याशी लग्न झाले, त्यावेळी आशाताईंचे वय १६ तर गणपतरावांचे वय ३१ होते. सुरुवातीला अन्य गायिकेने नकार दिलेली गाणी त्यांच्या वाट्याला येत असत, अल्प मानधनावर त्यांना टुकार गाणी गायला लागत असत. बी ग्रेड, सी ग्रेड नायिकांवर चित्रित असलेली गाणी त्यांनी गायली. मात्र मिळालेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोन्यात रूपांतर केलं.

स्वररूपिणी आशा
सुरांच्या अथांग आकाशातील 'आशा'

५७ साली ‘नया दौर’मध्ये ओपींच्या उडत्या चालीवर रफीसाहबसोबतचं ‘मॉंग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, हेमंतकुमार यांच्या संगीतातलं ‘जागृती’मधलं ‘दे दी हमे आझादी बिना खड्‌ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’, सी. रामचंद्र यांचा संगीतसाज आणि भरत व्यास यांनी रचलेलं ‘नवरंग’मधलं ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘तू छुपी है कहॉंऽ मै तडपता यहॉं’, जयदेव यांचं संगीत असलेलं देव आनंद-साधनावरचं ‘हम दोनो’मधलं रोमॅण्टिक ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’, ‘काला पानी’तलं देव आनंदला विनंती करणारं मधुबालाचं ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘मेरा साया’तलं ‘झुमका गिरा रे’, ओपी-कमर जलालाबादींचं ५८ सालच्या ‘फागून’मधलं ‘एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मिठा मिठा गम दे गया’, ‘तिसरी कसम’चं लोकगीतं ‘पान खाये सैया हमारो, सावली सुरतीयॉं होठ लाल लाल’, ‘किस्मत’मधलं शमशाद बेगमसोबतचं ‘कजरा मोहोब्बतवाला अखियों मे ऐसा डाला’, ‘पेईंग गेस्ट’मधलं चुलबुल्या नूतनला देव आनंद छेडतो तेव्हाचं ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘वक्त’मधलं ‘आगे भीऽ जाने ना तूऽ, पिछे भी जाने ना तू, जो भी है, बस यही एक पल है’, कोंबडी पकडणाऱ्या ‘बांगडू’ किशोरदांसोबतचं ‘हाल कैसा है जनाब का’, ‘हावडा ब्रिज’मधलं ‘आईयेऽ मेहरबॉं’, झीनतवरचं ‘हरे रामा’तलं ‘दम मारो दम’, ओपींचं ‘चॉंद उस्मानी-किशोरदां यांच्यावरचं ‘बाप रे बाप’मधलं ‘पिया पिया पिया मोरा जिया पुकारे, हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे’, शहरयार यांनी रचलेलं खय्याम यांनी संगीत दिलेलं ‘उमराव जान’मधलं ‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारों है’, ‘ये क्या जगहा है दोस्तो, ये कौनसा दयार है’, ‘तुमसा नही देखा’तलं ‘सर पे टोपी लाल, हाथ मे रेशम का रूमाल, हो तेरा क्या कहना’, ‘एक मुसाफिर एक हसीना’तलं ‘बहुत शुक्रिया बडी मेहरबानी’, नासिर हुसेन यांच्या ‘तिसरी मंझील’मधलं अतिशय गोड ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दुंगी जान जुदा मत होना रे’, ‘ओ हसीना जुल्फोवाली जानेजहॉं’, ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’, ‘आदमी और इन्सान’मधलं ‘जिंदगी इत्तफाक है’, ‘अनहोनी’मधलं ‘मैने होठो से लगाई तोऽऽ हंगामा हो गया’, ‘बांगडू’सोबतचं ‘आशा’मधलं ‘इना मिना डिका’, ‘काश्मीर की कली’तलं ‘इशारों इशारों मे दिल लेनेवाले’, गुलजार यांचं ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है’, हेलनच्या बहारदार नृत्यावरचं ‘कारवॉं’तलं ‘पिया तू अब तो आजा’, ‘मेरे सनम’चं ‘जाईये आप कहॉं जायेंगे, ये नजर लौटके फिर आयेंगी’, ‘ज्वेल थिफ’चं ‘रात अकेली है, बुझ गए दिये’, ‘शिकार’चं ‘पर्दे मे रहनें दो पर्दा ना उठाओ’, ‘द ग्रेट गॅम्बलर’मधलं अमिताभ-झीनतवरचं फॉरेनमध्ये होडीतलं रोमॅण्टिक ‘दो लफ्जों की हैऽऽ दिल की कहानी’,‘पुकार’मधलं ‘बचके रहना रे बाबाऽऽ बच के रहना रे’, परवीन बॉबीचं नृत्य असलेलं ‘जवानी जानेमन हसीन दिलरूबा’, ‘हम किसी से कम नही’तलं ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना’, ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’, ‘मुकद्दर का सिकंदर’चं ‘ओ साथी रे तेरे बिना क्या जिना’, ‘लगान’चं ‘राधा कैसे ना जले’ अशी खूप मोठी गाणी आशाताईंची आहेत.

स्वररूपिणी आशा
संगीतातील अखेरची, पण कायमची सम्राज्ञी - संजीव साबडे

मराठीतही अजरामर गाणी

मराठीत गदिमा-यशवंत देवांचं ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’, ‘सिंहासन’मधलं सुरेश भटांचं ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’, बहिणाबाईंचं ‘अरे खोप्यामंधी खोपा सुगरणीचा चांगला’, खेबुडकरांचं ‘सतीचं वाण’मधलं ‘किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘फटाकडी’तलं नांदगांवकरांचं ‘लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा नि काश्मीरला, कुठं कुठं जायाचं हनीमूनला’, हेमंतकुमार यांच्यासोबत गायलेलं सुधीर मोघेंचं ‘हा खेळ सावल्यांचा’मधलं ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, पी. सावळाराम यांचं ‘भालू’मधलं ‘गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन’, ‘चंद्र आहे साक्षीला’, भा. रा. तांबेंचं वसंत प्रभूंच्या संगीतसाजातलं बाबुजींसोबत गायलेलं ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’ अशी अजरामर गाणी आशाताईंनी गायली.

स्वररूपिणी आशा
"माझी प्रिय बहीण मी आज गमावली"; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने राज्यात शोककळा, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण

पुरस्कार

‘राष्ट्रीय पुरस्कार’, असंख्य ‘फिल्मफेअर पुरस्कार’, मध्य प्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार', 'महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार' आणि २००८ मध्ये मिळालेला 'पद्मविभूषण पुरस्कार' हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी. आकाशवाणीच्या वतीने 'जीवनगौरव पुरस्कार'ही त्यांना देण्यात आला.

स्वररूपिणी आशा
सुरातले नाते नात्यातले सूर... दिवंगत लता मंगेशकर यांनी आपल्या धाकट्या बहिणीबाबत लिहिलेला लेख

१२ हजार गाणी

आशाताईंनी आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांना आवाज दिला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत. आशा भोसले यांच्यावर ९० मान्यवरांनी लिहिलेल्या ९० लेखांचं आणि दुर्मिळ छायाचित्रांचं स्वरसामिनी आशा हे पुस्तक आहे. या पुस्तकात गायक, संगीतकार, गीतकार, साहित्यिक, दिग्दर्शक, लेखक आणि कुटुंबीय अशा ९० मान्यवरांनी लिहिलेले ९० लेख, तसेच आशाताईंची दुर्मीळ छायाचित्रे आहेत.

स्वररूपिणी आशा
खळाळता चैतन्यस्वर हरपला; आशा भोसले काळाच्या पडद्याआड

उत्तम गृहिणी

आशाताईंनी उत्तम पार्श्वगायिका होण्याबरोबरच उत्तम गृहिणी आणि उत्तम आई होण्याचे कसब पण उत्तमरीतीने पार पाडले होते. गाण्यासोबतच आशाताईंचा दुसरा आवडता छंद होता तो म्हणजे स्वयंपाक. “मी आयुष्यात गायिका झाली नसती तर नक्कीच चांगलीच शेफ झाली असती. लोकांना चांगले खायला घातले असते,” असे एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते. निरनिराळ्या व्हेज आणि नॉनव्हेज डिशेस शिकून घेतल्या. परदेशामध्ये ‘आशाज्’ या नावाच्या रेस्टॉरंटची सुरुवात आपला धाकटा मुलगा आनंद याच्या सहाय्याने केली. पहिले रेस्टॉरंट दुबई येथे सुरू केले. आता त्यांची गल्फ आणि ब्रिटनमध्ये मिळून सहा रेस्टॉरंट्सची मालिका आहे. ब्रिटनमधल्या बर्मिंगहॅम येथल्या रेस्टॉरंटला तर ‘सर्वोत्तम रेस्टॉरंट’ म्हणून पुरस्कार पण मिळाला आहे.

स्वररूपिणी आशा
Asha Bhosle Last Public Appearance : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनच्या लग्नात हजेरी; हसतमुखाने पापाराझींना केला नमस्कार, VIDEO

८०व्या वर्षी अभिनयात प्रवेश

नूतन, वहिदा रेहमान, साधना, हेमा मालिनी, नर्गीस यासारख्या आघाडीच्या नायिकांबरोबरच हेलनसारख्या अभिनेत्रीलाही योग्य आवाज देऊ शकल्या. दीर्घकाळ गायन करणाऱ्या आशा भोसले यांनी वयाच्या ८० व्या वर्षी २०१३ साली अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. आशा भोसले यांनी 'माई' या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांना या क्षेत्रात लोकांनी खूप पसंती दिली. त्यांचा अभिनय पाहून लोकांनी हे मान्य केले की त्या एक चांगली गायिका असण्यासोबतच एक बहुगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व देखील आहेत.

स्वररूपिणी आशा
Asha Bhosle : स्वर हरपला… पण वारसा अमर! गिनीज रेकॉर्डने जग जिंकणाऱ्या आशा ताईंची अफाट कारकीर्द जाणून घ्या

आशादीदींनी मागे वळून पाहिले नाही

पंचमदांची साथ मिळाल्यानंतर आशाताईंनी एकापेक्षा एक अशा गाण्यांची बरसात केली. १९४३ साली ‘माझा बाळ’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चला चला नव बाळा...’ या गाण्याने आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला होता. ४८ साली हंसराज बहल यांच्या ‘चुनरियाँ’ या चित्रपटात ‘सावन आया...’ हे गीत गाऊन आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. ५३ साली बिमल रॉय यांनी ‘परिणीता’साठी आशाताईंना संधी दिली, ५४ साली राज कपूर यांनी ‘बूट पॉलिश’मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है...’ गायला दिलं. पुढे ओ. पी. नय्यर यांनी ५६ साली ‘सीआयडी’साठी संधी देऊन आशादीदींच्या पदरात मोठं यश दिलं.

logo
marathi.freepressjournal.in