उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमध्ये शनिवारी (६ डिसेंबर) मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. क्लब मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा यांच्या मुख्य शाखेवर बुलडोझर चालवण्याचे आदेश मंगळवारी (९ डिसेंबर) मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले. मुख्यमंत्री सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मुख्य आऊटलेट तातडीने पाडण्याचे निर्देश दिले.
सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा यांचे वॅगेटॉर (Vagator) येथील 'रोमिओ लेन'चे मुख्य आऊटलेट जमीनदोस्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.
दुर्घटनेनंतर लुथ्रा बंधूंचे पलायन
या दुर्घटनेनंतर काही तासांतच क्लब मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा हे थायलंडला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या काही तासांनंतर ७ डिसेंबर रोजी पहाटे ५:३० वाजता इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने ते फुकेतला पळून गेले. त्यानंतर इंटरपोलने सौरभ आणि गौरव लुथ्रा यांच्याविरुद्ध ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
सरकारी जमिनीवर बेकायदेशीर शॅक
गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “वॅगेटॉरमधील रोमिओ लेनचा शॅक येथील सरकारी जमिनीवर बेकायदेशीररित्या बांधलेला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व औपचारिकता पूर्ण करून ते मंगळवारी पाडण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने संपूर्ण मशिनरी तयार ठेवली आहे.”
मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांत २० कर्मचारी आणि ५ पर्यटकांचा समावेश
आगीत मृत पावलेल्या २५ जणांपैकी २० जण कर्मचारी तर ५ जण पर्यटक होते. दिल्ली–एनसीआरमधील एकाच कुटुंबातील चार पर्यटकांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच, कर्नाटकातील आणखी एकाचा मृत्यू येथे झाला. यावेळी एक व्यक्ती आपल्या पत्नीचा जीव वाचवून बाहेर आला, पण पत्नीच्या तीन बहिणींना वाचवण्यासाठी तो परत आत गेल्यावर आगीत होरपळून मृत्यूमुखी पडला.
सिलेंडर ब्लास्ट नाही तर इलेक्ट्रॉनिक फटाके
अंतर्गत तपासानुसार, इंडोअर इलेक्ट्रॉनिक फटाक्यांच्या ठिणग्या लाकडी छताला लागल्यामुळे आग भडकली. याआधी पसरलेल्या सिलेंडर स्फोटाच्या चर्चांना पोलिसांनी फेटाळले आहे.
वरिष्ठ व्यवस्थापकांवरही कारवाई
या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटक झाली आहे. यात चीफ जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, बार मॅनेजर, गेट मॅनेजर, ऑपरेशन्स मॅनेजर यांचा समावेश आहे.
या दुर्घटनेने गोव्यातील नाईटलाइफ स्थळांवरील सुरक्षेची स्थिती आणि परवान्यांच्या नियमांचे पालन याबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.