अश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशी म्हणजे देवतांचे वैद्य, धन्वंतरी देवता यांची जयंती. देव आणि राक्षस यांच्या समुद्रमंथनातून धन्वंतरी प्रकट झाले. चार हात असलेल्या भगवान धन्वंतरींच्या एका हातात अमृत कलश, दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र असते.
यंदा धनत्रयोदशी १८ ऑक्टोबर २०२५, शनिवार रोजी आहे. या दिवशी कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. या दिवशी सोन्या-चांदीशिवाय अन्य वस्तू आवर्जून खरेदी केल्या जातात. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू १३ पटीने वाढतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. चला तर मग जाणून घेऊया या धनत्रयोदशीचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजन विधीबाबत ..
अश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी हातात अमृताने भरलेला कलश घेऊन समुद्रमंथनातून प्रकट झाले होते. धन्वंतरी भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासूनच दिवाळीचा सण साजरा होतो आणि लक्ष्मीपूजनाच्या आधी हा दिवस साजरा केला जातो.
या दिवशी धनाची पूजा केली जाते. कमावलेली संपत्ती घरात टिकून राहावी, वृद्धिंगत व्हावी, यासाठी धनत्रयोदशीला पूजा केली जाते. संध्याकाळी ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्य लाभते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी यमदीपदानही केले जाते. दिवे लावताना घराबाहेर एक दिवा लावून त्याचे टोक दक्षिण दिशेला करून नमस्कार केल्यास अपमृत्यु टळतो, असा समज आहे.
हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी १८ ऑक्टोबर, शनिवार दुपारी १२:१८ वाजता सुरू होऊन १९ ऑक्टोबर, रविवार दुपारी १:५१ वाजेपर्यंत राहणार आहे. प्रदोषकाळ १८ ऑक्टोबरला येत असल्यामुळे याच दिवशी धनतेरस साजरी केली जाणार आहे.
शुभ मुहूर्तानुसार, संध्याकाळी ५.५७ वाजेनंतर धनत्रयोदशीची पूजा करावी.
धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी नित्यकर्म संपवून धन्वंतरी पूजनाचा संकल्प करा. धन्वंतरीची मूर्ती किंवा तसबीर स्थापन करा. पूजनापूर्वी गणपतीची आराधना करा. त्यानंतर धन्वंतरीचे आवाहन करा आणि षोडशोपचार पूजन करा. पूजनानंतर 'ॐ श्री धनवंतरै नमः' मंत्राचा जप करा. तसेच 'ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धनवंतरायेः अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय। त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूपश्री धन्वंतरि स्वरूप श्री श्री श्री अष्टचक्र नारायणाय नमः' असे म्हणत धन्वंतरीला मनपूर्वक नमस्कार करा. शक्य असल्यास धन्वंतरी स्तोत्राचे पठण करा.