छायाचित्र : पिंटरेस्ट
लाईफस्टाईल

लसणाच्या लोणच्याचे ढीगभर फायदे; कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यापासून पचन सुधारण्यापर्यंत... रेसिपी लगेच नोट करा

लसणामध्ये असलेले औषधी गुणधर्म हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात, त्यामुळे रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात लसणाचं लोणचं समाविष्ट करणे फायदेशीर ठरते.

Mayuri Gawade

भारतीय स्वयंपाकघरात लसूण लोणचं ही केवळ चव वाढवणारी गोष्ट नाही, तर आरोग्यासाठीही खूप उपयुक्त मानली जाते. विशेषतः वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी लसणाचं लोणचं एक नैसर्गिक आणि सोपा उपाय ठरू शकतो. लसणामध्ये असलेले औषधी गुणधर्म हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात, त्यामुळे रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात लसणाचं लोणचं समाविष्ट करणे फायदेशीर ठरते.

लसणाचे लोणचे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कसे उपयुक्त ठरते?

  • अलिसीनचे फायदे

    लसणामध्ये आढळणारे ‘अलिसीन’ हे सल्फरयुक्त संयुग वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करते. याचबरोबर चांगल्या कोलेस्ट्रॉलची (HDL) पातळी सुधारण्यासही ते उपयुक्त ठरते.

  • रक्त प्रवाह सुधारतो

    लसणामधील अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांमध्ये साठलेली चरबी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि हृदयावरचा ताण कमी होतो.

  • पचनक्रिया मजबूत होते

    लसणाचं लोणचं पचन सुधारतं. पचन व्यवस्थित झाल्यास शरीरात अतिरिक्त चरबी साठण्याचे प्रमाण कमी होतं, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास होतो.

लसणाचे लोणचे बनवण्याची सोपी रेसिपी

साहित्य:

  • सोललेल्या लसूण पाकळ्या - 100 ग्रॅम

  • मेथी दाणे - 1 चमचा

  • मोहरी दाणे - 1 चमचा

  • हळद पावडर - 1 चमचा

  • लाल तिखट - 2 चमचे (चवीनुसार)

  • मीठ - 2 चमचे

  • लिंबाचा रस - 2 ते 3 लिंबांचा

  • तीळ तेल - सुमारे 100 मिली

कृती:

प्रथम लसूण स्वच्छ धुऊन सोलून घ्यावा आणि पूर्णपणे वाळवून घ्यावा. लोणच्यासाठी लसूण पूर्ण कोरडा असणे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर एका कोरड्या पॅनमध्ये मेथी आणि मोहरीचे दाणे हलकेसे भाजून घ्यावेत. दाणे थंड झाल्यावर त्यांची पूड करून घ्यावी.

एका मोठ्या भांड्यात हळद, लाल तिखट, तयार मेथी-मोहरी पावडर आणि मीठ नीट मिसळावं. त्यात लिंबाचा रस घालून मिश्रण एकसारखे करावं. आता या मसाल्यात लसणाच्या पाकळ्या घालून नीट मिक्स कराव्यात. वेगळ्या पॅनमध्ये तीळ तेल गरम करून कोमट होऊ द्यावं आणि हे तेल लोणच्यावर ओतावं. तेलाने लसूण पूर्ण झाकला गेला पाहिजे. तयार लोणचे काचेच्या बरणीत भरून 7 ते 10 दिवस ठेवा आणि दररोज एकदा हलवून घ्या. लोणचे मुरल्यावर खाण्यास तयार होते.

महत्त्वाच्या टिप्स

  • लसणाचं लोणचं मर्यादित प्रमाणातच खावं, कारण जास्त सेवन केल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो.

  • शक्यतो घरचं ताजं लोणचं खावं. बाजारातील लोणच्यांमध्ये प्रिझर्वेटिव्ह्ज असू शकतात.

  • तेलाचा वापर योग्य प्रमाणात करावा. जास्त तेल टाळावं, पण लोणचे टिकण्यासाठी आवश्यक तेवढं तेल असणं गरजेचं आहे.

लसूणाचे लोणचे केवळ कोलेस्ट्रॉल कमी करण्यापुरते मर्यादित नसून, ते पचन सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते. अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने लसणाचे लोणचे आहारात समाविष्ट केल्यास चव आणि आरोग्य यांचा सुंदर समतोल साधता येतो.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...