उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून कडक उन्हामुळे त्वचेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेसोबत अल्ट्राव्हायोलेट किरणांचा धोका वाढला असून अनेकजण सनस्क्रीन वापरत असले तरी ते योग्य प्रमाणात लावत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषत: चेहरा, मान आणि कान या भागांकडे दुर्लक्ष केल्याने टॅनिंग, पिग्मेंटेशन आणि त्वचेचे अकाली नुकसान होऊ शकते.
त्वचेचे सूर्यकिरणांपासून योग्य संरक्षण करण्यासाठी सध्या 2-Finger Rule ची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, चेहरा आणि मानेसाठी योग्य प्रमाणात सनस्क्रीन वापरण्याची ही सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत मानली जाते.
काय आहे 2-Finger Rule?
या नियमामध्ये तर्जनी आणि मधल्या बोटावर सनस्क्रीन लावले जाते. हे प्रमाण चेहरा आणि मानेसाठी पुरेसे मानले जाते. तर्जनी आणि मधल्या बोटाच्या साहाय्याने चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणे उत्तम ठरते. अनेकजण केवळ चेहऱ्यावर सनस्क्रीन लावतात, मात्र मान, कान आणि हातांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्वचेवर सूर्यकिरणांचा परिणाम अधिक होऊ शकतो.
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, योग्य प्रमाणात सनस्क्रीन न वापरल्यास त्याचा SPF प्रभाव कमी होतो आणि त्वचेला पूर्ण संरक्षण मिळत नाही.
सनस्क्रीन कधी आणि कसे लावावे?
घरातून बाहेर पडण्याच्या किमान १५ ते २० मिनिटांपूर्वी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. त्वचा स्वच्छ आणि कोरडी असताना सनस्क्रीन लावल्यास ते अधिक प्रभावी ठरते. तसेच, दर दोन ते तीन तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावण्याचा सल्ला दिला जातो.
चेहरा, मान, कान तसेच हातांच्या उघड्या भागांवर सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे मानले जाते.
योग्य SPF किती असावा?
भारतीय हवामान आणि वाढत्या उष्णतेचा विचार करता SPF 30 ते SPF 50 असलेले सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच UVA आणि UVB दोन्ही प्रकारच्या किरणांपासून संरक्षण देणारे 'ब्रॉड स्पेक्ट्रम' सनस्क्रीन निवडणे अधिक फायदेशीर ठरते.
'या' चुका टाळा
खूप कमी प्रमाणात सनस्क्रीन वापरणे.
दर काही तासांनी पुन्हा सनस्क्रीन न लावणे.
मान, कान आणि हातांकडे दुर्लक्ष करणे.
सनस्क्रीनमध्ये मॉइश्चरायझर मिसळणे.
मेकअपमधील SPF पुरेसा असल्याचे गृहित धरणे.
त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सनस्क्रीनचा वापर हा रोजच्या दिनक्रमाचा भाग असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.