परदेशात रोमिंगची कटकट संपणार! आता WhatsApp वरूनच खरेदी करता येणार Travel eSIM, जिओसह अनेक कंपन्यांची भागीदारी  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

परदेशात रोमिंगची कटकट संपणार! आता WhatsApp वरूनच खरेदी करता येणार Travel eSIM, जिओसह अनेक कंपन्यांची भागीदारी

सध्या परदेशात गेल्यानंतर मोबाइल इंटरनेट वापरण्यासाठी प्रवाशांना इंटरनॅशनल रोमिंग पॅक घ्यावा लागतो किंवा स्थानिक सिमकार्ड खरेदी करावे लागते. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

परदेशात फिरायला जाताना इंटरनेट वापरण्यासाठी अनेकांना इंटरनॅशनल रोमिंग पॅक घ्यावा लागतो किंवा संबंधित देशात पोहोचल्यानंतर स्थानिक सिमकार्ड खरेदी करावा लागतो. मात्र, आता यासाठी वेगळी धावपळ करावी लागणार नाही. कारण, व्हॉट्सॲपने आपल्या युजर्ससाठी नवी सुविधा आणण्याची घोषणा केली आहे. या सुविधेमुळे आता थेट व्हॉट्सॲपवरूनच परदेश प्रवासासाठी ट्रॅव्हल ई-सिम खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी जिओसह अनेक दूरसंचार कंपन्यांशी भागीदारी करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशात गेल्यानंतर इंटरनेट सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

जिओसह अनेक कंपन्यांची भागीदारी

मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सॲपने या नव्या सुविधेसाठी ई-सिम सेवा पुरवठादार आणि दूरसंचार कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. यामध्ये भारतातील रिलायन्स जिओसह व्हेरिझॉन, स्मार्ट ॲक्सियाटा आणि स्मार्ट कम्युनिकेशन्स या कंपन्यांचा समावेश आहे. व्हॉट्सॲपचे प्रमुख कुणाल शाह यांनीही एक्सवरील पोस्टद्वारे या सुविधेची माहिती दिली आहे.

कसे काम करणार हे नवे फीचर?

सध्या परदेशात गेल्यानंतर मोबाइल इंटरनेट वापरण्यासाठी प्रवाशांना इंटरनॅशनल रोमिंग पॅक घ्यावा लागतो किंवा स्थानिक सिमकार्ड खरेदी करावे लागते. मात्र, व्हॉट्सॲपच्या नव्या सुविधेमुळे ॲपमधूनच वेगवेगळे ट्रॅव्हल ई-सिम डेटा प्लॅन पाहता येतील. त्यानंतर आपण ज्या देशात जाणार आहोत, त्या देशानुसार आणि आपल्या इंटरनेट वापराच्या गरजेनुसार प्लॅन निवडता येईल.

प्लॅन खरेदी केल्यानंतर ई-सिम फोनमध्ये इन्स्टॉल करता येईल. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेसाठी वेगळ्या वेबसाइटवर किंवा अन्य ॲपवर जाण्याची गरज भासणार नाही. व्हॉट्सॲपच्या मते, ही प्रक्रिया मेसेज पाठवण्याइतकी सोपी असेल.

जुना व्हॉट्सॲप नंबरही राहणार कायम

या नव्या सुविधेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ट्रॅव्हल ई-सिम वापरण्यासाठी आपला नेहमीचा व्हॉट्सॲप नंबर बदलण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती भारतातून अमेरिका किंवा ब्रिटनला फिरायला गेली, तरी ती आपल्या भारतीय नंबरवरूनच व्हॉट्सॲप वापरू शकेल. ट्रॅव्हल ई-सिमच्या माध्यमातून मोबाइल डेटा उपलब्ध झाल्यामुळे कुटुंबीयांशी चॅट करणे, व्हॉट्सॲप कॉल करणे, ऑनलाइन मॅप वापरणे किंवा कॅब बुक करणे सोपे होईल.

मात्र, एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ट्रॅव्हल ई-सिमच्या माध्यमातून केवळ मोबाइल डेटा मिळणार आहे. या ई-सिममुळे नेहमीच्या मोबाइल नंबरवरील कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळणार नाही. त्यासाठी तुमचे मूळ सिम किंवा अन्य योग्य सेवा सुरू असणे आवश्यक असेल.

ही सुविधा कधीपासून सुरू होणार?

व्हॉट्सॲपने ही सुविधा लवकरच काही निवडक देशांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, सुरुवातीला कोणत्या देशांमध्ये ही सेवा उपलब्ध होईल, याची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच ई-सिमच्या डेटा प्लॅनची किंमत, डेटा मर्यादा आणि वैधता किती असेल, याबाबतही कंपनीने माहिती दिलेली नाही.

ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप ॲपमध्येच ई-सिम खरेदीचा पर्याय दिसणार आहे. मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित स्मार्टफोनमध्ये ई-सिम सपोर्ट असणे आवश्यक आहे. त्यामुळे परदेश प्रवास करणाऱ्या आणि इंटरनेटसाठी रोमिंगवर अवलंबून असलेल्या प्रवाशांसाठी व्हॉट्सॲपचे हे नवे फीचर उपयोगी ठरू शकते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : परळ स्थानकातील पादचारी पुलाचा जिना तोडणार; प्रस्तावित पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मोडतोड

कसारा-CSMT लोकलमध्ये थरार; बिडी ओढण्यास विरोध करताच प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला, तिघे फरार

Mumbai : कचरा हटविण्याचे आव्हान; केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून झाडाझडती, कचऱ्यापासून ऊर्जानिमिर्ती प्रकल्प राबवा

झाडे लावून मुंबईची हवा शुद्ध होणार नाही, बसेस वाढवा; प्रवीणसिंह परदेशी यांचा महापौरांना सल्ला

मुंबईतील बंद हायड्रंटचे ऑडिट करा; दिक्षा कारकर यांचे आयुक्तांना पत्र