नारायण राणे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

आधी प्रकृती बिघडली आणि आता निवृत्तीच्या चर्चांवर खुलासा; नारायण राणे म्हणाले, "मी तसे बोललोच नाही...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात राणेंना भोवळ आल्याने काही काळ धावपळ उडाली होती.

किशोरी घायवट-उबाळे

भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी रविवारी (दि.४) आपल्या भाषणात राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा सुरू होती. अशातच, आज (दि.५) चिपळूणमधील एका कार्यक्रमात त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रकृतीची माहिती दिली. तसेच, त्यांनी राजकीय निवृत्तीच्या चर्चांवर भाष्य केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात राणेंना भोवळ आल्याने काही काळ धावपळ उडाली होती. भाषणादरम्यान त्यांचा आवाज बसला होता. चक्कर आल्यासारखे वाटत असल्याने त्यांनी भाषण आटोपते घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले आणि ते थेट कार्यक्रमस्थळावरून गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. मात्र, नंतर माध्यमांशी संवाद साधत नारायण राणे यांनी आपल्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली.

नारायण राणे यांनी सांगितले की, "भाषण करत असताना माझे ब्लड प्रेशर कमी झाले होते, तसेच डायबेटिसची शुगर पातळी सव्वातीनशेच्या पुढे गेली होती. त्यामुळे अस्वस्थपणा आणि चक्कर आली. मात्र, सध्या आपली तब्येत पूर्णपणे ठीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राजकीय निवृत्तीच्या चर्चांवर नारायण राणे यांनी पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिली. “निवृत्तीचे संकेत कोणी दिले? मी तसे काहीही बोललो नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला. “माझे वक्तव्य नीट ऐका. जर मी जनतेसाठी परिणामकारक काम करू शकलो नाही, तर त्या पदाचा उपयोग काय?" असे मी म्हटले होते. निवृत्त होतो असे मी कुठेही म्हटलेले नाही,” असे राणेंनी स्पष्ट केले.

"जर माझ्या पदाचा उपयोग जनतेला होत नसेल किंवा होऊ दिला जात नसेल, तर पूर्णविराम देण्याचा विचार करेन, असे माझे वक्तव्य होते," असेही राणेंनी सांगितले. त्यामुळे राजकीय निवृत्ती घेणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

यापूर्वी सिंधुदुर्गातील सभेत बोलताना नारायण राणे यांनी आपल्या साध्या जीवनशैलीचा उल्लेख केला होता. “आजही मी स्वतः रस्त्यावर भाजी घेतो. माझ्या गाडीला काळ्या काचा नाहीत. माणुसकी हाच माझा धर्म आहे. राजकारणात कट-कारस्थानं झाली, अडचणी आल्या, आताही येत आहेत. त्यामुळे घरी बसायचं ठरवलं,” असे त्यांनी म्हटले होते. मात्र, या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे सांगत त्यांनी निवृत्तीच्या चर्चांना आता स्पष्टपणे नकार दिला आहे.

१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

Navi Mumbai Election : "... अन्यथा नाईकांचा 'टांगा' कुठे फरार होईल कळणार नाही", शंभूराज देसाई यांचा इशारा

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

'बॉर्डर २'मधील वरुण धवनच्या अभिनयावर टीका करण्यासाठी ₹५ लाखांची ऑफर; इन्फ्लुएन्सरचा दावा, कॉल रेकॉर्डिंगही केली शेअर

विवाहित प्राध्यापकासोबत संबंध; घरगुती हिंसाचार प्रकरणात महिलेची याचिका बॉम्बे हायकोर्टाने फेटाळली