संग्रहित छायाचित्र
क्रीडा

Vinesh Phogat: " आई कुस्ती माझ्याशी जिंकली पण मी हरले..." विनेश फोगटने केली निवृत्तीची घोषणा

Tejashree Gaikwad

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी केवळ काही ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आल्यानंतर आता भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

विनेश फोगटने गुरुवारी (८ ऑगस्ट) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पहाटे एक पोस्ट करत ही घोषणा केली. " आई, कुस्ती माझ्याशी जिंकली पण मी हरले, माफ कर...तुझे स्वप्न...माझे धैर्य...सर्व तुटले...माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४. मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन, क्षमस्व...," अशी भावूक पोस्ट करीत तिने कुस्तीला अलविदा केल्याचे जाहीर केले.

‘म्हारी छोरीयाँ छोरो से कम है के’ हा दंगल चित्रपटातील संवाद ज्या फोगट बहिणींच्या संघर्षावर आधारित होता, त्यातील विनेश फोगटने आपल्या कारकिर्दीत प्रचंड संघर्ष करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपले नाणे किती मजबूत आहे, हे संपूर्ण देशाला दाखवून दिले.

मंगळवारी रात्री उपांत्य फेरीत क्युबाच्या खेळाडूवर विजय मिळवून विनेशने अंतिम फेरीत धडक मारली. सुवर्णपदकासाठी खेळणारी पहिली भारतीय महिला कुस्तीवीर बनण्याचा इतिहास तिने घडवला. बुधवारी सकाळपर्यंत ती किमान रौप्यपदकाची दावेदार होती. पण दुपारनंतर फक्त विनेशच नव्हे तर संपूर्ण देशवासियांना ४४० व्होल्टचा झटका बसला. दिवसाच्या सुरुवातीला केल्या जाणाऱ्या वजन तपासणीसाठी गेल्यानंतर तिचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅमने जास्त होते. भारतीय कुस्ती महासंघाने प्रचंड विनवण्या करूनही विनेशला वजन कमी करण्यासाठी वेळ दिला गेला नाही. नियमाप्रमाणे तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे तिला आता ५० किलो वजनी गटात शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावे लागणार आहे. या धक्क्याने तसेच निर्जलीकरणामुळे विनेश जागेवरच कोसळल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे देशात प्रचंड संतापाची लाट पसरली असून यामागे काहीतरी घातपात अथवा कटकारस्थान रचण्यात आले आहे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

विनेश फोगाटची कारकीर्द

विनेश फोगाट ही भारताची २९ वर्षीय महिला पैलवान असून तिचे हे तिसरे ऑलिम्पिक आहे. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला दुखापत झाली होती त्यामुळे तिला कांस्यपदक जिंकता आले नाही. तर २०२० टोकिलो ऑलिम्पिकमध्ये तिला ५३ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत वेनेसा कलाडझिंस्कायाकडून पराभव पत्करावा लागला होता.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा