उन्हाळ्यात वाढणारे तापमान, प्रखर सूर्यप्रकाश आणि घाम यामुळे त्वचेवर विविध दुष्परिणाम होऊ शकतात. या काळात सनबर्न, त्वचा कोरडी पडणे, तेलकटपणा वाढणे तसेच अकाली सुरकुत्या येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी समर स्किनकेअर रूटीन पाळणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
उन्हाळ्यात सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेर पडताना किमान SPF 30 असलेला सनस्क्रीन वापरणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच शरीर आणि त्वचा हायड्रेट राहण्यासाठी पुरेसे पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात अनेकांच्या त्वचेत तेलाचे प्रमाण वाढते, त्यामुळे योग्य स्किनकेअर रूटीन पाळल्यास तेलकटपणा, बंद झालेली छिद्रे आणि पिंपल्स यांसारख्या समस्या टाळता येतात.
सनस्क्रीनचा नियमित वापर करा :
उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन अत्यंत महत्त्वाचे आहे. किमान SPF 30 असलेला ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरावा. बाहेर असताना दर दोन तासांनी तो पुन्हा लावण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
शरीर हायड्रेट ठेवा :
पुरेसे पाणी पिल्याने त्वचा आतून निरोगी राहते. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि कोरडेपणा किंवा जळजळ कमी होते. हायलुरॉनिक ॲसिड किंवा ग्लिसरीन असलेले हायड्रेटिंग सीरमही वापरू शकता.
हेव्ही मेकअप टाळा :
उन्हाळ्यात हेव्ही मेकअप किंवा जाड क्रीम वापरण्याऐवजी हलक्या टेक्श्चरचे जेल-बेस्ड मॉइश्चरायझर किंवा लोशन वापरणे अधिक योग्य ठरते. यामुळे त्वचा तेलकट होत नाही आणि घामही कमी जाणवतो.
नियमित एक्सफोलिएशन (Exfoliation) करा :
त्वचेवरील मृत पेशी (dead skin) काढून टाकण्याची प्रक्रिया अर्थात एक्सफोलिएशन (Exfoliation) करणे फायदेशीर ठरते. मात्र अतिप्रमाणात एक्सफोलिएशन केल्यास त्वचा अधिक संवेदनशील होऊ शकते.
त्वचेसाठी पोषक घटक निवडा :
व्हिटॅमिन C आणि E सारखे अँटिऑक्सिडंट असलेले स्किनकेअर प्रॉडक्ट्स त्वचेला सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. तसेच अॅलोवेरा, दही, गुलाबपाणी किंवा केळी यांसारखे नैसर्गिक घटक त्वचेला पोषण देण्यास मदत करतात.
त्वचेच्या रिॲक्शनवर लक्ष द्या :
उन्हाळ्यात त्वचा लाल होणे, जळजळ किंवा तेलकटपणा वाढणे अशा समस्या जाणवल्यास स्किनकेअर रूटीनमध्ये बदल करणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
या सोप्या उपायांचा अवलंब केल्यास उन्हाळ्यातही त्वचा निरोगी, ताजीतवानी आणि चमकदार ठेवता येऊ शकते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)